भाजपच्या नेत्यांऐवजी वळसे-पाटील, धनंजय मुंडेंची मविआच्या माजी मंत्र्यांना साथ; भाजपचे आशिष देशमुख यांचा आरोप

गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केल्याने महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असून नजीकच्या भविष्यात त्यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे हे विदर्भात भाजपच्या नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील दोन माजी मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केल्याने महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असून नजीकच्या भविष्यात त्यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळाप्रकरणी सहकार कायद्यानुसार सुनील केदार आणि अन्य दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुली प्रकरणात वळसे-पाटील सातत्याने सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून निर्णय करीत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अनिल देशमुख, सुनील केदार यांना झुकते माप

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयात १२ सप्टेंबर रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी बैठकच अचानक रद्द केली. भाजपच्या श्रेष्ठींना याची कल्पना देण्यात आली, तरीही कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्याचप्रमाणे वळसे-पाटील हे सुनील केदारप्रकरणी भाजपच्या श्रेष्ठींचेही ऐकत नाहीत, असेही आशिष देशमुख म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in