
अमरावती येथील एका 20 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत जबरदस्तीने आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मुलीला शोधून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी नवनीत राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चांगलीच बाचाबाची झाली. त्या तरुणीला कोंडून ठेवले आले असून संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र तो कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. पोलिस तातडीने कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. नवनीत राणा यांनी यासंदर्भात राजापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना फोन केला असता त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल केला. यावेळी पोलिस उपायुक्त विक्रम साळी आणि पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्याशी त्यांची जोरदार वादावादी झाली. यावेळेस राजापेठ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनीही पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. काल संशयित आरोपीला अटक करूनही मुलीचा ठावठिकाणा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांनी ही मुलगी तातडीने शोधून काढली नाही तर कायदा हातात घेऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.