अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा घणाघात...
अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी/मुंबई

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

“राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रिलियन डॉलर करणार आहे. एक ट्रिलियन डॉलर शब्द म्हणजे फुगवलेला आकडा आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचे असेल तर महसूल आणणार कुठून? कारण राज्यात उद्योग राहिलेले नाहीत. तज्ज्ञांचा अहवाल झोप उडवणारा आहे. तरी तुम्ही एक ट्रिलियनची भाषा करत असून तुमचा हा आकड्यांचा खेळ राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. विधानसभेत गुरुवारी सन २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे काढले. “अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही सरकारची युक्ती आहे. राज्यात दु:शासनाच्या औलादी मोकाट फिरत असल्याने राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांना साड्यांऐवजी सरकारने शस्त्र वाटावीत,” अशी उपहासात्मक टीका वडेट्टीवार यांनी केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस पत्नींचा जाहीर अपमान करतात. वर आमचा बाप सागर बंगल्यात बसला असून आमचे कुणी वाकडे करू शकणार नाही, अशी भाषा वापरतात. हा महिलांचा सन्मान आहे का? असा सवाल वडेट्टावार यांनी केला.

“अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काय केले, याचा उल्लेख केला नाही. या दोन्ही स्मारकाकडे तुमचे अक्षम्य दुर्लक्ष आहेच. पण पुणे येथील महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली, हे तुम्ही सांगितले पाहिजे.

अर्थसंकल्पात राज्याला आर्थिक शिस्त लावण्याऐवजी आर्थिक स्थिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. राज्याची अंदाजित महसुली तूट सन २०२४-२५ मध्ये ९ हजार ७३३ कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. राज्याची अंदाजित राजकोषीय तूट सन २०२४-२५ मध्ये ९९ हजार २८८ कोटी दाखवण्यात आली आहे. येत्या जुलैमध्ये जेव्हा तुम्ही अतिरिक्त अर्थसंकल्प मांडाल, त्यावेळी यामध्ये सुमारे १ लाख कोटीपर्यंत वाढ झालेली दिसेल., असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in