शासकीय रुग्णालयातील प्रत्येक मृत्यूची चौकशी ; तीन डॉक्टरांच्या चौकशी समितीची नेमणूक

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली आहे.
शासकीय रुग्णालयातील प्रत्येक मृत्यूची चौकशी ; तीन डॉक्टरांच्या चौकशी समितीची नेमणूक

नांदेड : नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रत्येक मृत्यूची चौकशी केली जाईल, यासाठी डॉक्टरांची तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

३१ जणांच्या मृत्यूमुळे नांदेड शहरासह अख्खा महाराष्ट्र हादरला. शासनस्तरावर घटनेची दखल घेण्यात आली. त्यानंतर हसन मुश्रीफ, पालक मंत्री गिरीश महाजन, शिक्षण आयुक्त डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी मंगळवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. सुरुवातीलाच मुश्रीफ यांनी रुग्णालय परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून हे सर्व पाहून शरम वाटली, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शासकीय रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत. त्या पूर्ण कराव्या लागतील. येथील रिक्त पदे भरण्यात येतील. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करावी, डॉक्टरही कंत्राटी पद्धतीने भरावेत, अशा सूचना आपण दिल्या असून, ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे आदेश आपण दिले आहेत, असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

रुग्णालयाची क्षमता ५०० बेडची असताना ७०० रुग्ण येथे येतात. यापुढे एकही मृत्यू होणार नाही, याची काळजी घेऊ, झालेल्या प्रत्येक मृत्यूची चौकशी केली जाईल. यात हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले. यावेळी पालक मंत्री गिरीश महाजन, खा. प्रताप पाटील-चिखलीकर यांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in