ठाकरेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा, शिवसेनेच्या पक्षनिधीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी

शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना प्रत्येकजण समोरचा गट कसा कोंडीत सापडेल, याची तजवीज करीत आहे.
ठाकरेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा, शिवसेनेच्या पक्षनिधीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी

विशेष प्रतिनिधी/मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना प्रत्येकजण समोरचा गट कसा कोंडीत सापडेल, याची तजवीज करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाविरोधात सातत्याने कोणता ना कोणता चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. आता शिवसेनेच्या पक्षनिधीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या पक्षनिधीतून ठाकरे गटाने ५० कोटी काढल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर यासंबंधी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे ठाकरे गट गोत्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या पक्षनिधीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आरोप करीत आले आहेत. याअगोदरही जाहीर सभांमधून त्यांनी या निधीविषयी वाच्यता केली आहे. याच ५० कोटींवरून आता तक्रार समोर आली असून, पक्षाच्या निधीतून ठाकरे गटानेच ही रक्कम काढली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून आता या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यामुळे आगामी काळात पक्षनिधीचा वादही चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी खरी शिवसेना कोणाची, हा वाद सुरू होता. निवडणूक आयोग आणि विधानसभा सभापतींनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला. त्यामुळे शिवसेना आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. परंतु शिवसेना आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे आता पक्षनिधीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाचे असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे निधी नेमका कधी काढला गेला आणि तो कुणी काढला, याची चौकशी करण्यात येत असून, यावरून ऐन निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळणार आहेत.

बँक अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावले

शिवसेना आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यापासून पक्षनिधीचा वाद प्रथमच समोर आला. सध्या पक्षनिधीसंबंधीचे खाते कोण चालवतो आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढले, ते नेमके कुणी काढले, याची माहिती मागविण्यात आली असून, यासंबंधी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यालाही चौकशीसाठी बोलावल्याचे समजते. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाची झाल्यापासून पक्षाचा कर कोण भरत आहे, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in