राम मंदिर सोहळ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्येत येत्या २२ तारखेला राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राममंदिराचा लोकार्पण सोहळा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.
राम मंदिर सोहळ्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

प्रतिनिधी/मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे निमंत्रण दिले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार, अयोध्येला जाणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निमंत्रणानंतर दिली आहे. अद्याप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या सोहळयाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. ते लवकरच देण्यात येईल, अशी शक्यता आहे.

अयोध्येत येत्या २२ तारखेला राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. राममंदिराचा लोकार्पण सोहळा या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. देशभरातील महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा सोहळा असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे आमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून हे आमंत्रण देण्यात आले आहे. “या आमंत्रणाचा आपण विनम्रपणे स्वीकार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होताना पाहणार, अयोध्येला जाणार,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांना अद्याप तरी निमंत्रण देण्यात आलेले नसले तरी ते मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र २२ जानेवारी रोजी आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी आधीच जाहीर केले आहे. “राममंदिरासाठी कारसेवकांनी संघर्ष केला, रक्त सांडले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनीही खूप भोगले आहे. कायदा करून मंदिर उभारावे, अशी आमची मागणी होती. मात्र शेवटी न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिर बांधण्यात आले,” असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in