
मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत ९ जूनपासून सुरू होत आहे.
या पाच दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडित धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसीटीसीच्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील.
पाच दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. या यात्रेचा प्रवास रायगड किल्ला, पुणे, शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला, कोल्हापूरची आई महालक्ष्मी, पन्हाळगड किल्ला आणि मुंबईला परत, असा असेल. तसेच यात्रेत पुणे शहरातील लालमहाल, कसबा गणपती, शिवसृष्टी याठिकाणी भेटींचाही समावेश असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली.
या प्रमुख स्थळांना भेट
रायगड किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे : पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग : १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला : अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला : बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.