बारामतीतून अजितदादांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार का? युगेंद्र पवार म्हणाले...

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.
बारामतीतून अजितदादांविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार का? युगेंद्र पवार म्हणाले...
Published on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्याविरोधात उमेदवारी द्यावी, अशी मागणी काल युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. यानंतर बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. दरम्यान युगेंद्र पवार यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. बारामती विधानसभेच्या उमेदवारीबद्दल शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही.

कार्यकर्ते स्वतःहून शरद पवार साहेबांकडे गेले...

दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युगेंद्र पवार यांनी याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, "लोकसभेतील विजयाच्या आनंदात कार्यकर्ते उत्साही आहेत. ते स्वतःहून तिथं (शरद पवार यांच्याकडे) गेले. मला नंतर मिडियाच्या माध्यमातून ते समजलं. त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली असेल. त्यांना आपण थांबवू शकत नाही."

शऱद पवारांनी तुम्हाला विधानसभा लढा असं सांगितलं, तर तुम्ही लढणार का, या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले की, "शरद पवार साहेबांबर याबाबत अजिबात चर्चा झालेली नाही. जर तरच्या गोष्टीत बोलून उपयोग नाही. जर झालं तर बघू."

याशिवाय बारामती मतदारसंघातील प्रश्नांवरही युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "बारामतीमध्ये फिरताना असं जाणवलं. शहरामध्ये खूप विकास झालाय. पण शहरासोबत ग्रामीण भागाचा विकास होणं महत्त्वाचं आहे, असं आम्हाला जाणवलं. सध्या दुष्काळाची समस्या आहे. काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट आहे. काही शाळांत चांगले शिक्षक नव्हते."

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घवघवीत यश मिळवलं. पक्षानं लढवलेल्या १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळवला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा १ लाख ५८ हजार मतांनी पराभव केला. शरद पवार विरुद्ध अजित पवार या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना ४८ हजारांचं मताधिक्य मिळालं. लोकसभा निवडणूकीतील यशानंतर आता पक्षानं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदा ८५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार पक्षानं केला आहे. दरम्यान शरद पवार बारामतीतील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.

logo
marathi.freepressjournal.in