आयसीसचे जाळे ग्रामीण भागातही ;महाराष्ट्रासह देशभरात १९ ठिकाणी छापे : महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेट

एनआयएच्या पथकांनी केलेल्या कारवाईत कर्नाटकातील बल्लारी आणि बंगळुरूमध्ये पसरलेल्या १९ ठिकाणी छापे टाकले.
आयसीसचे जाळे ग्रामीण भागातही ;महाराष्ट्रासह देशभरात १९ ठिकाणी छापे : महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेट
PM

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) सोमवारी महाराष्ट्रासह देशभरात १९ ठिकाणी छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागातही केलेल्या छापेमारीत दहशतवादी संघटनांनी विद्यार्थ्यांना टार्गेट केल्याचे उघड झाले आहे. या विद्यार्थ्यांची इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयितांकडून काही स्फोटके आणि स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी केमिकल्सही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी मुंबईतील एकासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती आणि पुण्यातही अद्याप काही जणांची चौकशी सुरू आहे.

एनआयएने सोमवारी राज्यात अमरावती, पुणे, मुंबई येथे छापेमारी केली. यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या छापेमारीत अनेक केमिकल्स, संशयास्पद कागदपत्रे, रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आयसीसच्या आणखी एका म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. छाप्यात अटक केलेला मिनाझ ऊर्फ सुलेमान हा महाराष्ट्रातील आयसीसचा मोहरक्या आहे. अटक केलेले आरोपी आयसीसचा प्रचार करत होते, असे एनआयएच्या तपासातून उघड झाले आहे.

जप्त केलेल्या केमिकल्सचा वापर करून आयईडी बॉम्ब बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, असा संशय आहे. सर्व आरोपी हे जिहाद, खिलाफत आणि आयसीसच्या मार्गावर होते, असा एनआयएचा आरोप आहे. एनक्रिप्टेड अप्लिकेशन्सचा वापर करून आरोपी हँडलर्सच्या संपर्कात होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांना यामध्ये सहभागी होण्यास भाग पाडत असल्याचा एनआयएचा संशय आहे.

अमरावतीत अटक केलेला

तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी

अमरावतीच्या अचलपूर शहरातील बियावाणी चौकात रविवारी मध्यरात्री एनआयएने छापेमारी केली. या प्रकरणी सायम अली सय्यद अहमद अली नावाच्या १८ वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण अचलपूरच्या जगदंबा कॉलेजचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याकडून लॅपटॉप, कागदपत्रे, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याला एनआयएचे पथक अमरावतीला घेऊन गेले असून चौकशीतून सर्व प्रकार समोर येईल.

येथे टाकले छापे

एनआयएच्या पथकांनी केलेल्या कारवाईत कर्नाटकातील बल्लारी आणि बंगळुरूमध्ये पसरलेल्या १९ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात अमरावती, मुंबई आणि पुणे, तर झारखंडमधील जमशेदपूर, बोकारो आणि नवी दिल्लीत छापेमारी केल्याचे म्हटले आहे. छाप्यांदरम्यान अटक करण्यात आलेले आठ जण हे आयसीसशी संबंधितांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचेही एनआयएने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in