
बीबीसीच्या (BBC) कार्यालयांवर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारीवरून राजकारण तापले असतानाच आता पुण्यातील एका उद्योजकाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सिटी ग्रुपचे (City Group) अध्यक्ष आणि अॅमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Anirudha Deshpande) यांच्या घरावर आणि पुण्यातील कार्यालयावर आज पहाटे आयकर विभागाने धाड टाकली. अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेपासून अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची आणि कार्यालयाची झाडाझडती सुरु करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याचे स्पष्टीकरण यावेळी आयकर विभागाकडून देण्यात आले आहे. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांचे निकटवर्तीय तर आहेतच. शिवाय अनेक बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कार्यालयावर पडलेल्या या छापेमारीमुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ उडाली आहे.