अकोल्यातही होणार तिरंगी लढत...

अकोला मतदारसंघात कधी भाजप तर कधी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र २००४ पासून या मतदारसंघातून सातत्याने भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे हेच विजयी होत आले आहेत. २०१९ मध्ये तर धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर दोन लाखाचे मताधिक्य घेतले होते.
अकोल्यातही होणार तिरंगी लढत...

अविनाश पाठक

अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळी देखील तिरंगी लढत होणार हे चित्र आज स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे तीन प्रमुख उमेदवार लढतीत आहेत. याशिवाय अजून १२ म्हणजेच एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

अकोला मतदारसंघात कधी भाजप तर कधी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र २००४ पासून या मतदारसंघातून सातत्याने भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे हेच विजयी होत आले आहेत. २०१९ मध्ये तर धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर दोन लाखाचे मताधिक्य घेतले होते.

गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे हे आजारी आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांचा मुलगा अनुप धोत्रे याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊ केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचे देखील या भागात चांगले वजन आहे. त्यांची वंचित बहुजन आघाडी म्हणजेच आधीचा भारिप बहुजन महासंघ या पक्षाने या परिसरात बऱ्यापैकी मूळ धरले आहे. इथून काही आमदारही त्यांनी निवडून दिले होते. तसेच १९९८ मध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर देखील इथून विजयी झाले होते. आजही त्यांचा अकोल्यात चांगला जनसंपर्क आहे.

काँग्रेसने या भागात मतदारसंघात यावेळी डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अभय पाटील हे कुशल अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून विख्यात आहेत. त्यांचीही पक्षात आणि मतदारसंघात प्रतिमा चांगली आहे.

असे असले तरी या मतदारसंघातील वंचितची ताकदही अगदीच नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकर यांनी अगदी पंचायत स्तरापासून माणसं जोडलेली आहेत. त्यामुळे ते देखील चांगली लढत देऊ शकतात.

काँग्रेसचे होते चांगले वर्चस्व

काही वर्षांपूर्वी या मतदारसंघात काँग्रेसचे चांगले वर्चस्व होते. त्यावेळी कैलासवासी वसंत साठे, मधुसूदन वैराळे असे दिग्गज नेते या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. आजही इथले काँग्रेसचे नेटवर्क अगदीच दुर्लक्षितता येत नाही.

आता येईल प्रचाराला वेग

धोत्रे, पाटील आणि आंबेडकर हे तीन प्रमुख उमेदवार वगळता बाकी सर्वच उमेदवार हे फारसा प्रभाव दाखवतील अशी अवस्था आज तरी दिसत नाही. अर्ज दाखल होऊन आणि वापस घेण्याची तारीख संपून आता अपक्षांना चिन्ह वाटपही कालच आटोपले आहे. त्यामुळे या दोन दिवसात प्रचाराला वेग येणार आहे. या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तोपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार हे नक्की आज तरी या मतदारसंघात तिरंगी लढत होईल असे चित्र दिसत आहे.

विधानसभाक्षेत्रानुसार तरी भाजपाचे वर्चस्व

जवळजवळ १९ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला पूर्व, आणि अकोला पश्चिम हे पाच विधानसभा क्षेत्र अकोला जिल्ह्यातील आणि रिसोड हे विधानसभा क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट आणि मूर्तीजापूर हे चार मतदारसंघ भाजपकडे आहेत, तर बाळापूर हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेकडे आणि रिसोड हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. हे बघता आज तरी या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व चांगले आहे असे म्हणता येते.

logo
marathi.freepressjournal.in