छत्रपती संभाजीनागर : राज्य सरकार इतर मागासवर्ग समाजाचेच ऐकत आहे, त्यामुळे सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मराठा समाजाचा अनादर करीत आहे, राज्य सरकार केवळ इतर मागासवर्ग नेत्यांना वेळ देऊन त्यांचेच ऐकत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे, त्यामुळे अशा सरकारला हटविण्याची गरज आहे, असे जरांगे म्हणाले.
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मराठा उमेदवार रिंगणात उतरविण्याबाबत २९ ऑगस्टनंतर निर्णय घेण्यात येईल, निवडणुकीत कोणाशीही आघाडी नसेल. अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविण्याबाबत व उमेदवारांच्या सामाजिक समीकरणांबद्दल आम्ही विचार करू, असेही ते म्हणाले.