अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करणं दुर्देवी ; शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर

अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केल्याचं म्हटलं होतं
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करणं दुर्देवी ; शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अभूतपूर्व घटना घडताना दिसत आहेत. शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे. अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हासह सत्तेत सामील होत असून आमचा गट राष्ट्रवादी असल्याचं सांगितलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं बोललं जाऊ लागलं. यामुळे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला.

यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केल्याचं म्हटलं होतं. यानंतर आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला पत्र पाठवून आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. आता शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपली बाजू मांडण्यात आली आहे. यात त्यांनी अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणं अकाली आणि दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळावी, असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं आहे.

यावेळी बोलताना शरद पवार गटाने सांगितलं की, अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसंच पक्षात कुठले वाद आहेत हे सिद्ध करण्यास अजित पवार हे प्राथमिक दृष्ट्या सक्षम नसल्याचं देखील या याचिकेत म्हटलं आहे. १ जून २०२३ च्या आधी अजित पवार यांनी शरद पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कुठलीही तक्रार दिली नाही. तसंच कोणत्याही नेत्याचा विरोध केला नव्हता. असा युक्तीवाद शरद पवार यांच्या गटाकडून मांडण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी अनेकदा मीडियासमोर हा आमच्या पक्षातील अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत त्यावर भाष्य करणं टाळलं आहे. शदर पवार हेच आमचे आदर्श असून त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर करुन आम्हाला आशिर्वाद द्यावेत, असं वक्तव्य वारंवार अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात येत आहेत. यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून दोन वेळा शरद पवार यांची भेट घेण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही गटात समझोता होणार का? किंवा राष्ट्रवादी पक्ष कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in