'दुल्हन हम ले जायेंगे' म्हणत जालनामधील व्यावसायिकाची 390 कोटी मुद्देमालासह आयकर विभागाने काढली वरात

विशेष म्हणजे या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 120 गाड्यांचा ताफा घेऊन छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाचे 2500 हून अधिक लोक सामील होते
'दुल्हन हम ले जायेंगे' म्हणत जालनामधील व्यावसायिकाची 390 कोटी मुद्देमालासह आयकर विभागाने काढली वरात

जालनामध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामुळे एक स्टील व्यावसायिक चांगलाच गोत्यामध्ये आला आहे. त्याची करोडोंची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मात्र हा छापा यशस्वी करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. हि छापेमारी कुणालाही कळू नये म्हणून प्राप्तिकर विभागाने कमालीची गुप्तता पाळली. विशेष म्हणजे या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 120 गाड्यांचा ताफा घेऊन छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाचे 2500 हून अधिक लोक सामील होते. या सगळ्यांना घेऊन ते छापा टाकत आहेत हे कोणालाही कळू न देणे अवघड होते. पण तरीही एका कारणामुळे हे शक्य झाले. वऱ्हाडी असल्याचे भासवून वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी धाड टाकण्याची योजना आखली होती. हे जितके आश्चर्यकारक वाटते तितकेच, यशस्वी छाप्यानंतर कौतुक व्यक्त केले जात आहे.

१ ऑगस्ट रोजी आयकर विभागाने जालन्यामध्ये धाड टाकून कोणी कल्पनाही करू शकत नाही, अशा पद्धतीने नियोजन करून आयकर विभागाची वाहने पोलाद व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांमध्ये घुसून त्यांना थक्क करून सोडले. वधू-वरांच्या नावाचे स्टिकर लावलेल्या गाडीत आयकर विभागाचे अधिकारी असतील, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. यासोबत एक विशेष कोड शब्दही वापरण्यात आला.

दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर्स लावून कोड वर्ड तयार करण्यात आला. लोकांना वाटले की ही वरात आहे. पण तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती की वर आयकर विभागाचे अधिकारी येणार आहे. अखेर नियोजन यशस्वी झाले. स्टील व्यापाऱ्यांचे घर, फार्म हाऊस आणि कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. आठ दिवसांच्या तपासानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा सापडला.

500 रुपयांच्या नोटांचे बंडल, पलंगाखाली आणि बॅगमध्ये ठेवलेली रोकड, हिरे, 32 किलो सोने, 56 कोटी रुपयांची रोकड, असा एकूण 390 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलाद व्यावसायिकाने हे पैसे कसे जमा केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in