आयटी छाप्याचे कारण सांगून सव्वादोन कोटींचा गंडा; दाम्पत्याविरोधात गुन्हा, पतीला बेड्या, पत्नी फरार
नाशिक : आयकर विभागाने माझ्या घरी छापा टाकून सहा कोटींची रोकड जप्त करुन ७०० कोटींचे व्यवहार गोठवल्याचा बनाव करीत शहरातील एका ब्रोकर दाम्पत्याने परिचितांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित ऋषिराज टेकाडेला अटक केली असून त्याची पत्नी संशयित रविना टेकाडेचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर संपतराव तिडके यांनी फिर्याद नोंदवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऋषिराज टेकाडे यांनी आपली जानेवारीमध्ये आपली भेट घेवून आयटी विभागाने माझ्या घरी छापा टाकून सहा कोटींची रक्कम जप्त केल्याचे सांगितले. शिवाय, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावरील सातशे कोटीची रक्कम गोठवल्याचा दावाही टेकाडे यांनी केल्याचे तिडके म्हणाले. या परिस्थितीमुळे कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाल्याने पन्नास लाख रुपये उसनवार द्यावेत अशी मागणी केली.
दोघांचा चांगलाच परिचय असल्याने तिडकेंनी ६५ लाख ३९ हजार रुपये टेकाडेंना दिले. त्यापैकी केवळ एक लाख तीस हजार रुपये टेकाडेने परत केले. बरेच दिवस उलटूनही उर्वरित ६४ लाख रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिडकेंनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
