पुणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काल नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिलेल्या ऑफरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांनी उत्तर दिलं. मोदींजींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही. तो सल्ला होता, असं फडणवीस म्हणाले. याशिवाय अरविंद केजरीवालांचा जामीन, राहुल गांधी तसेच विरोधी पक्षांची भूमिका, पुणे विमानतळ, स्मार्ट सीटी इत्यादी विषयांवरील पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.
ही ऑफर नाही, सल्ला आहे...
काल महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नंदुरबार येथे पार पडली. छोट्या पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंबंधीच्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तसेच शिवसेना उबाठा गटाला खुली ऑफर दिली होती. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, "अनेक माध्यमांनी असं दाखवलं की मोदीजींची शरद पवारांना ऑफर. ही ऑफर नाही, सल्ला आहे. याचं कारण, मोदीजी काय म्हणाले? बारामतीच्या निवडणूकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की , बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीये, तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की, चार जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. त्यामुळं निवडणूकीचा निकाल काय आहे, ते पवार साहेबांना समजतो. मोदीजी म्हणाले, काँग्रेस डुबती नाव आहे, त्यामुळं तिकडं जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत जावं आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं. तर कदाचित तुमचे मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफर होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो."
पक्ष कमजोर झाला की पवारसाहेब काँग्रेसमध्ये जातात...
फडणवीसांनी शरद पवारांवर टीका करत म्हटलं आहे की, ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला, त्या त्या वेळी ते काँग्रेसमध्ये गेले. तिथं जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले.
ते बाहेर असे आले जसे स्वातंत्र्यसेनानी...
अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, 'केजरीवाल यांना कोर्टानं अंतरिम जामीन दिलाय. नियमित जामीन दिलेला नाही. कारवाई जर चुकीची असती, तर हायकोर्टानं किंवा सुप्रीम कोर्टानं त्यांना काहीतरी दिलासा दिला असता. पण कोर्टानं सांगितलंय की आम्ही अपवादात्मक परिस्थितीत जामीन देतोय, कारण त्यांना प्रचार करता यावा. परंतु त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करता येणार नाही. त्यानंतरही ते बाहेर असे आले जसे स्वातंत्र्यसेनानी आहेत. ते महान कार्य करून तुरुंगात गेलेत का? बाहेर आल्यावर कशाचे सत्कार घेता?
काँग्रेसनं एकाच नेत्याला १७ वेळा लॉन्च केलं-
राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवू शकत नाही. काँग्रेस आपल्या कर्मानं खाली गेलीये. कारण काँग्रेसला माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये क्षमताच नाही, तरीही त्याच नेत्याला १७ वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी तो फेल गेला, असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना टोला लगावला.
फडणवीस म्हणाले की, "आमचं हे मत आहे की देशात विश्वासार्ह विरोधी पक्ष हवाय. राजकारण वर खाली होतं. एक वेळ आमचे दोन खासदार होते. आम्हालाही हिणवलं जायचं. 'पर्याय पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आलेत दोन...' पण त्याहीवेळी आम्ही विश्वासार्ह विरोधी पक्ष म्हणून होतो. ज्यावेळी देशाला गरज होती, तेव्हा आम्ही पुढे आलो. पण सध्याचा विरोधी पक्ष प्रगल्भता दाखवायलाच तयार नाही. देशाकरता, समाजाकरता एक भूमिका घ्यावी लागते. पण त्यांची एकच भूमिका, मोदींना शिव्या द्यायच्या. म्हणूनच आज आपल्याला विरोधी पक्षांची ही अवस्था पाहायला मिळतीये."
आम्ही ९० टक्के विकासावर बोलतो...
फडणवीसांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, 'आम्ही ९० टक्के विकासावर बोलतो, काय करायचंय याचं व्हिजन मांडतो, केवळ १० टक्केच राजकारण करतो. आमचे विरोधक भाषणात १ टक्काही विकासावर बोलत नाहीत. गद्दार, खुद्दार यावरती निवडणूक नाहीये. तुमचं लोकांसाठी काय व्हिजन आहे, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, यावर निवडणूक आहे. ज्यावेळी ते विकासाविषयी आमच्याशी बोलायला जातात, तेव्हा त्यांच्याकडे एकही आयकॉनिक प्रोजेक्ट नाही. त्यामुळं ती अशी टीका करतात. पण लोकांना माहितीये आम्ही काय केलं, आमच्या सरकारनं काय केलं.'
पुरंदर विमानतळ होणारच, पण...
फडणवीसांनी पुणे विमानतळ तसेच पुरंदर विमानतळ यांच्या विकासाच्या प्रश्नावर उत्तरं दिली. "पुण्याचं विमानतळाचं विस्तारिकरण आपण केलं, चांगलं नवीन टर्मिनल उभारलंय. आणि इथला नवीन रनवे वाढवण्यासाठी डिफेन्सशी अंतिम टप्प्यात पोहोचलो आहे. पुरंदर विमानतळ होण्यास आणखी चार वर्ष लागतील. तोपर्यंत या विमानाचं विस्तारिकरण करत आहोत. पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ करावंच लागेल", असं फडणवीस म्हणाले.
हे प्रोजेक्ट्स स्मार्ट सीटी अंतर्गतच..
पुणे स्मार्ट सिटी कधी होणार, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, हे सगळे प्रोजेक्ट स्मार्ट सीटीअंतर्गत होत आहे. पुणे विमानतळाचा विकास, मेट्रो इ. प्रकल्प स्मार्ट सीटीचाच भाग आहेत. त्यांचं लोकार्पण आता होऊ लागलं आहे.
माझ्या अटकेकरता पोलीस आयुक्तांना सुपारी-
माझ्या अटकेकरता एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले. केसापासून नखापर्यंत त्यांनी माझी चौकशी केली. पण मी आधीच सांगितलं होतं की मी एवढं आक्रमकपणे बोलतोय कारण मी काचेच्या घरात राहत नाही. पण पोलीसांनीही त्यांना साथ दिली नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.