विशेष प्रतिनिधी/मुंबई
ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मंगळवारी अचानक नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार आणि त्यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळणार, असा कयास लावला जात होता. परंतु काही वेळानंतर दानवे यांनी स्वत: मोबाईल फोन सुरू केला आणि आपण कुठेही जाणार नाही. उलट विरोधकांनीच मला संपर्क करण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे मी मोबाईल बंद करून ठेवला होता. आपल्या मनात कुठलाही संभ्रम नाही. खैरे यांना उमेदवारी मिळाली, तरी आपण जोमाने काम करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता खैरे-दानवे वाद मिटल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इच्छुक होते. परंतु, शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दानवे नाराज असल्याचे बोलले जात होते. अर्थात, खुद्द दानवे यांनीही आपली नाराजी बोलून दाखविली होती. त्यामुळे दानवे यांना विरोधी पक्षांकडून ऑफर दिली जात होती. तसेच थेट संपर्कही केला जात होता. एवढेच नव्हे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी तर छत्रपती संभाजीनगरमध्ये केव्हाही भूकंप होऊ शकते, अशी भविष्यवाणी वर्तवली होती.
दरम्यान, खुद्द दानवे यांनीच मोबाईल सुरू करून आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी यादीत माझे नाव असणे-नसणे माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. संघटनेत काही निर्णय होत असतात. पक्षप्रमुख सर्वांशी विचारविनिमय करून तसे निर्णय घेत असतात, ते निर्णय स्वीकारून पुढे चालायचे असते. लवकरच आमच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. माझ्या मनात कुठलाही संभ्रम नाही. छत्रपती संभाजीनगरमधून खैरे यांना उमेदवारी दिली तरी आपण जोमाने काम करू, असे अंबादास दानवे म्हणाले. एवढेच नव्हे, तर मी आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे एकच आहोत, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खैरे-दानवे वाद आता मिटला असल्याचे बोलले जात आहे.
हे तर भाजपचे अपयश
मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळे आपण शिवसेनेचे काम करीत राहू. कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. विरोधकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार मिळत नाही, हेच आमच्या शिवसेनेचे यश असून भाजपचे अपयश आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला.