
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा केल्याने मोठा वादंग निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी शिंदे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘याबाबत संकुचित विचार नको’, असे सांगत शिंदे यांची बाजू सावरून घेतली, तर अजितदादांनी सावध भूमिका घेतली आहे.
राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शनिवारी विजयी मेळावा साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ची घोषणा करून विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. त्यामुळे आता यावरून राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील ‘जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर’च्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, अमितभाई हे महाराष्ट्राचे जावई आहेत. ते देशाचे गृहमंत्री आहेत, तर त्यांच्या होम मिनिस्टर या महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या आहेत. त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी आनंदाने नांदतात. त्यानंतर या भाषणाचा समारोप शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ असा नारा देत केला. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे.
सत्ताधारी महायुती सरकारवर ‘गुजरात धार्जिणे’ असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. यातच मुंबईतील अनेक महत्त्वाचे उद्योग हे गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गट करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
फडणवीस यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, यापूर्वी चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अनावरणाच्या वेळी आदरणीय शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र, जय कर्नाटक’ असे म्हटले होते. शरद पवार यांना कर्नाटक जास्त प्रिय आहे आणि महाराष्ट्र नाही, असा याचा अर्थ होतो का? आपण एका देशात, भारतात राहतो. बाजूची राज्ये ही पाकिस्तान नाहीत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
जिनके घर शिशे के होते हैं... - शिंदे
पुण्यातील कार्यक्रमात समोर बसलेली सगळी मंडळी ही गुजराती होती, त्यामुळे मी जय हिंद, जय महाराष्ट्र व शेवटी जय गुजरात म्हणालो, असा खुलासा करीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, ‘जिनके घर शिशे के होते हैं वो दुसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते’, असे सांगत उद्धव ठाकरेंची एक व्हिडीओ क्लिप दाखवली. या व्हिडीओ क्लिपमध्ये उद्धव ठाकरे एका सभेत ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ असे म्हणताना दिसत आहेत.
फडणवीसांनी केले शिंदे यांचे समर्थन
एखाद्या नेत्याने गुजराती समाजात गेल्यानंतर ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ असे म्हणणे यात गैर काहीही नाही. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी, असा आग्रह करू शकतो. पण दुराग्रह धरू शकत नाही. मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला तमिळ शिकण्याचा दुराग्रह करू शकत नाही. असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला.
हा गुजरातच्या वॉशिंग मशीनचा परिणाम - पटोले
महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल आणि मातृभाषेबद्दल या सरकारचे मत काय? हे आता स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण गुजरातच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये धुतले गेलेले आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनचा यांच्यावर झालेला परिणाम अद्यापही उतरलेला नसल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
‘डुप्लिकेट’ शिवसेनेचे खरे रूप समोर आले - राऊत
एकनाथ शिंदे यांच्या ‘डुप्लिकेट’ शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहांसमोर ‘जय गुजरात’ची गर्जना केली, काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल संजय राऊत यांनी केला.