

जळगाव : दिवाळीनिमित्त जळगावच्या काव्यरत्नावली चौकात तब्बल ३२ फूट उंचीचा भव्य ‘लामण दिवा’ उभारण्यात आला आहे. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही आकर्षक कलाकृती शहराच्या सौंदर्यात भर घालत असून, ती पाहण्यासाठी रात्री जळगावकरांची गर्दी होत आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या लामण दिव्याची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे ८०० किलो वजनाच्या या दिव्याला सोनेरी रंग देण्यात आला असून, त्यावर सात भव्य ज्योती साकारण्यात आल्या आहेत. प्रत्येक ज्योत सहा फुटांपेक्षा अधिक उंचीची आहे.
या सात ज्योतींमधून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण आणि धार्मिक अशा जीवनातील सात महत्त्वपूर्ण क्षेत्रांचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात या सर्व क्षेत्रांत प्रगती, समृद्धी आणि सकारात्मकता नांदावी, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे.
भारतीय संस्कृतीत दीप हा ज्ञान, मांगल्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. दिवा स्वतः प्रज्वलित होऊन परिसर उजळवतो, त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कृतीतून इतरांच्या जीवनातही आनंद आणि प्रगतीचा प्रकाश निर्माण करावा, असा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला आहे.
‘जळगावकरांचे वैभव वाढो’ या मंगल भावनेतून लामण दिव्याची निर्मिती करण्यात आली आहे. जळगावकरांच्या जीवनात सुख, समाधान आणि सर्वांगीण समृद्धी नांदावी, हीच या उपक्रमामागील भावना असल्याचे अशोक जैन यांनी स्पष्ट केले.