मोकाट कुत्र्यांमुळे बालकाचा गेला जीव; नागरिक संतप्त

जळगाव शहरात मोकाट कुत्रे आणि त्यांचा नागरिकांना होणारा त्रास यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रविवारी समता नगर परिसरातील अरविंद सचीन गायकवाड हा चार वर्षाचा बालक घराबाहेर अंगणात खेळत असतांना या बालकावर मोकाट कुत्रयाने हल्ला करत त्याच्या चेहरा, मान आणि गळ्याचे लचके तोडले, त्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला.
मोकाट कुत्र्यांमुळे बालकाचा गेला जीव; नागरिक संतप्त
Published on

जळगाव : जळगाव शहरात मोकाट कुत्रे आणि त्यांचा नागरिकांना होणारा त्रास यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रविवारी समता नगर परिसरातील अरविंद सचीन गायकवाड हा चार वर्षाचा बालक घराबाहेर अंगणात खेळत असतांना या बालकावर मोकाट कुत्रयाने हल्ला करत त्याच्या चेहरा, मान आणि गळ्याचे लचके तोडले, त्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला. पाठोपाठ मंगळवारी सकाळी डॉ. सुरेश अग्रवाल हे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर देखील एका कुत्र्याने हल्ला चढवला. या सततच्या प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून महापालिका या बेवारस कुत्र्यांविरोधात कोणतीही पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

आज जळगाव शहरात विविध भागात कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कुत्रे रस्त्यावर चालणाऱ्यांवर हल्ले करत आहे. शहरात हे बेवारस कुत्र्यांची संख्या २५ हजाराहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या बेवारस कुत्र्यांना आवरण्यासाठी‍ महापालिकेकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाही.

निविदेसाठी पुढाकार नाही

कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रियेची सातत्याने मागणी होत असतांना एक वर्षापासून ती बंद आहे. एप्रिलमध्ये कुत्र्यांनी चावण्याच्या २३१२ तर मे मध्ये २५३६ आणि १ जूनपासून २८ घटना झाल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले. जळगाव महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी नऊ वेळा निविदा काढल्या मात्र त्या भरण्यासाठी‍ कुणीही पुढे आले नाही. अन्य जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असतांना जळगावला प्रतिसाद का मिळत नाही? याबाबत महापालिकेने आत्मपरिक्षण करावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

ठाकरे गटाचा निषेध

जळगाव शहरात नागरिकांना या होत असलेल्या त्रासाविरोधात मंगळवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेत जाऊन जोरदार आंदोलन करत जनतेच्या भावना आयुक्तांसमोर मांडल्या. या प्रकाराचा निषेध म्हणून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना महानगर प्रमुख शरद तायडे व कार्यकर्त्यांनी खेळण्यातील कुत्रे भेट दिले.

logo
marathi.freepressjournal.in