जळगाव : लहान मुलांनी मांजरीची पिल्ले समजून जंगलातून आणली बिबट्याची पिल्ले

लहान मुले ही निष्पाप असतात, मुक्या प्राण्यांबाबत त्यांच्या मनात विशेष प्रेम व आकर्षण असते, याचे प्रत्यंतर सातपुड्यात बकऱ्या चारणाऱ्या चार लहान मुलांच्या कृतीवरून दिसून आले. सातपुड्याच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलांनी जंगलातून मांजरीसारखी दिसणारी चक्क बिबट्याची तीन पिल्ले घरी आणण्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली.
जळगाव : लहान मुलांनी मांजरीची पिल्ले समजून जंगलातून आणली बिबट्याची पिल्ले
Published on

जळगाव : लहान मुले ही निष्पाप असतात, मुक्या प्राण्यांबाबत त्यांच्या मनात विशेष प्रेम व आकर्षण असते, याचे प्रत्यंतर सातपुड्यात बकऱ्या चारणाऱ्या चार लहान मुलांच्या कृतीवरून दिसून आले. सातपुड्याच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या मुलांनी जंगलातून मांजरीसारखी दिसणारी चक्क बिबट्याची तीन पिल्ले घरी आणण्याची घटना घडल्याने गावात खळबळ उडाली.

सातपुड्यातील रावेर तालुक्यातील पालजवळ ही घटना घडली. सातपुड्यातील पालजवळील रूंदा बुंदा गावातील चार लहान मुले बकऱ्या चारण्यासाठी पालजवळील जंगलात गेली होती. तेथे त्यांना मांजरीसारखी दिसणारी तीन लहान पिल्ले दिसली. ही मांजरीची पिल्ले असावीत, असे समजून ती घरी सांभाळण्यासाठी नेण्याचा विचार त्यांच्या बालबुद्धीने केला. त्यामुळे या मुलांनी ही पिल्ले उचलून गावात आणली. या पिल्लांना घेऊन मुले गावात आली असता गावकऱ्यांचे लक्ष या पिल्लांकडे गेले आणि ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची आहेत, हे त्यांच्या लक्षात येताच ते हादरले.

वन्यजीवांच्या पिल्लांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते ही बाब त्या लहान मुलांना गावकऱ्यांनी समजावून सांगितली व जेथून ही पिल्ले आणली तेथे लगेच ठेवून येण्यास सांगितले. त्यानुसार या मुलांनी जंगलातून आणलेल्या ठिकाणी परत जात ती पिल्ले त्याच जागेवर सुरक्षित ठेवली. ही कामगिरी निर्धोकपणे पार पाडून ही मुले गावात परतताच गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दरम्यान, जंगलात कोणत्याही पिल्लांना हात न लावण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in