
जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथे शेताच्या कुंपणास लावलेल्या तारांमध्ये सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेताजवळून जात असताना विजेचा शॉक बसून एकाच शेतमजूर कुटुंबातील दोन महिला, दोन लहान मुले व एक पुरूष अशा पाच जणांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ग्रामीण भागात शेतातील पिकांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेताला असलेल्या तारांमधून विद्युत प्रवाह सोडला जातो. एरंडोल तालुक्यात वरखेडी येथे एका शेतकऱ्याच्या शेत कुंपणात विद्युतप्रवाह सोडण्यात आला होता. रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातून आलेल्या दोन महिला, दोन लहान मुले व एक पुरूष असे पाच जणांचे शेतमजूर कुटुंब सकाळी या शेताजवळून जात असताना त्यांना वीजप्रवाह सोडल्याची कल्पना नव्हती. त्यामुळे या पाच जणांना विजेचा शॅाक बसला. त्यात दोन महिला, एक पुरूष आणि दोन लहान मुले अशा पाच जणांचा मृत्यू झाला.
विकास रामलाल पावरा (३५), त्यांची पत्नी सुमन(३०), मुले पवन व कंवल आणि एक वृध्द महिला यांचा मृतांमध्ये समावेश आहे. याप्रकरणी शेतमालक बंडू युवराज चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.