

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे गंभीर संकट अधिकच तीव्र होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या २५ वर्षांत तब्बल २,७८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, केवळ २०२५ या एका वर्षात २०० आत्महत्यांची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या २५ वर्षांतील सर्वाधिक वार्षिक आत्महत्यांचा उच्चांक ठरला आहे.
एकेकाळी विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र,कालांतराने हे आत्महत्यांचे लोण जळगाव जिल्ह्यात पसरले. जिल्ह्यात प्रथमच २००१ मध्ये ९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. त्यानंतर २००२ मध्ये २, २००३ मध्ये १, २००४ मध्ये २५ आणि २००५ मध्ये २४ आत्महत्या झाल्या. पाहता पाहता हा आकडा दरवर्षी वाढत गेला. शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा पाहता, केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता ठोस उपाययोजना, तालुकानिहाय अभ्यास आणि दीर्घकालीन धोरणे राबवण्याची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित होत आहे.
२००१ ते २००५ : या पाच वर्षांत ६१ आत्महत्या
२००६ ते २०१० : ३५६ आत्महत्या
२०११ ते २०१५ : ६६९ आत्महत्या
२०१६ ते २०२० : ८०७ आत्महत्या
२०२१ ते २०२५ : ८९० आत्महत्या
नैराश्यातून टोकाचा निर्णय
यामध्ये २०२५ मधील २०० आत्महत्या या विशेष चिंताजनक मानल्या जात असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. कर्जबाजारीपणा हे शेतकरी आत्महत्येमागील प्रमुख कारण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. शेतीसाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा घरगुती गरजांसाठी घेतलेले कर्ज फेडण्यात अपयश आल्याने शेतकरी नैराश्यात जातो आणि त्यातून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे.
तालुकानिहाय नोंद पद्धत बंद
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे सध्या दरमहा होणाऱ्या आत्महत्यांचीच नोंद उपलब्ध असून, तालुकानिहाय तपशीलवार नोंद नसल्याने नेमक्या कोणत्या भागात आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, हे स्पष्ट होत नाही. पूर्वी तालुकानिहाय नोंद ठेवली जात होती, मात्र ती पद्धत आता बंद करण्यात आली आहे. पूर्वीच्या नोंदीनुसार पारोळा, अमळनेर, एरंडोल आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते.