जळगाव : धार्मिक उत्सवांना सामाजिक एकता आणि बंधुभावाची जोड मिळाल्यास समाजातील सलोखा अधिक दृढ होतो, याचे उदाहरण जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात पाहायला मिळते. येथे प्रयास विकास संस्थेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात असून, या उत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान दरवर्षी मुस्लिम समाजातील व्यक्तीला दिला जातो. यंदा प्रा. युनुस रशीद शेख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गणेशोत्सव मंडपापासून अवघ्या काही अंतरावर मशीद असून, नमाजाच्या वेळी गणपतीची आरती बंद ठेवली जाते. तसेच सायंकाळच्या नमाजनंतर मुस्लिम बांधव आरतीसाठी उपस्थित राहतात. रमजान ईदनिमित्त संस्थेतर्फे शिरखुर्मा व विविध वस्तूंचे वाटप केले जाते. हिंदू बांधवही त्यात सहभागी होतात.
प्रा. शेख यांच्या मते, आता हा सलोखा केवळ सणांपुरता मर्यादित राहिलेला नसून परिसरातील नागरिक कौटुंबिक सदस्यांप्रमाणे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. परिसरातील निवृत्त नागरिकांचा सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत गौरव केला जातो. व्यक्तीच्या धर्मापेक्षा समाजातील योगदानाला महत्त्व दिले जाते.