

जळगाव : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा डीजेमुक्त राहणार आहे. ५३ गणेशोत्सव महामंडळांनी अशा प्रकारचा ठराव रविवारी केला असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी दिली.
जळगावातील गणेशोत्सव हा शिस्तबद्ध व्हावा, यासाठी ३० वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अस्तिवात आले होते. गणेश मंडळांच्या विविध प्रश्नांबाबत महामंडळाचे ५०० वर कार्यकर्ते झटतात. गुलालमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना या महामंडळाने शहरात सुरू केली व गणेश मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळल्या जाऊ लागल्या. तीस वर्षानंतर महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मुकुंद मेटकर तर कार्याध्यक्ष दीपक जोशी यांची निवड झाली आहे.
अशी होणार अंमलबजावणी
जळगावचा गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा म्हणून रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी होईल. या आधीदेखील डीजेमुक्त मिरवणुका निघत होत्या याकडे लक्ष मेटकर यांनी वेधले. गणेशोत्सवाचे नियोजन चोख व्हावे, यासाठी एकूण सहा समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.