

जळगाव : जामनेर येथील तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन संतप्त झाले. कार्यालयातील अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेत साफसफाईला सुरुवात केली. मंत्र्यांनाच स्वच्छतेसाठी झाडू हातात घ्यावा लागल्याने महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जामनेर तहसील कार्यालयात आले होते. यावेळी कार्यालयात प्रवेश करताच त्यांना सर्वत्र अस्वच्छता आढळून आली. भिंतींवर धूळ साचली होती, छताला जाळे लागले होते. एका ठिकाणी दारूच्या बाटल्याही आढळल्या. तसेच कार्यालयाच्या आतील आणि बाहेरील परिसरासह स्वच्छतागृहाचीही दुरवस्था असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कार्यालयात स्वच्छता राखण्याबाबतचे फलक लावण्यात आले असतानाही प्रत्यक्षात सर्वत्र अस्वच्छता दिसून आल्याने महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतरांना स्वच्छतेचे आवाहन करण्यापेक्षा आपणच सुरुवात करावी, असे म्हणत त्यांनी हातात झाडू घेत साफसफाई करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या कृतीमुळे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.