सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प

जळगाव शहरात दररोज सरासरी पाच किलो सोन्यापासून दागिने तयार केले जातात. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दागिने तयार करण्यासाठी सोने वितळवणे, दागिने घडवणे तसेच त्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी कारागिरांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. सध्या गॅस उपलब्ध नसल्याने अर्धा किलो सोन्याचे दागिने तयार करणेही कठीण झाले आहे.
सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प
सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

जळगाव : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचे परिणाम आता जळगाव शहरातील विविध उद्योगांवर दिसू लागले आहेत. सुवर्ण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात गॅस सिलिंडरच्या अभावामुळे सुवर्ण अलंकार घडवणाऱ्या कारागिरांचे काम जवळपास ठप्प झाले आहे.

जळगाव शहराला “सुवर्ण नगरी” म्हणून ओळखले जाते. सोन्याच्या दागिन्यांसाठी या शहराची देशभरात ख्याती असून दागिन्यांच्या खरेदीसाठी विविध राज्यांतून ग्राहक येथे येत असतात. जळगाव शहरात दररोज सरासरी पाच किलो सोन्यापासून दागिने तयार केले जातात. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दागिने तयार करण्यासाठी सोने वितळवणे, दागिने घडवणे तसेच त्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी कारागिरांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. सध्या गॅस उपलब्ध नसल्याने अर्धा किलो सोन्याचे दागिने तयार करणेही कठीण झाले आहे. उपलब्ध गॅस संपल्यानंतर हे काम पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गॅसअभावी मागणी पूर्ण करणे अशक्य

विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे दागिन्यांची मागणी वाढली आहे. मात्र गॅसअभावी ही मागणी पूर्ण करणे शक्य होत नसल्याने सुवर्ण व्यवसाय अडचणीत आला आहे. शहरातील अनेक सुवर्ण कारागिरांनी आपले काम तात्पुरते थांबवले आहे. जळगावात जवळपास हजारहून अधिक परप्रांतीय कारागीर दागिने तयार करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. त्यांची जेवणाची व्यवस्था ज्वेलर्सकडून मेसद्वारे केली जाते. मात्र गॅस टंचाईमुळे जेवण बनवण्यावरही परिणाम होत असल्याने कारागिरांची गैरसोय होत आहे.

१५ ते २० उद्योग गॅसअभावी बंद

दरम्यान, जळगाव एमआयडीसीतील काही उद्योगांनाही या गॅस टंचाईचा फटका बसला आहे. शहरात कोटिंगचा व्यवसाय करणारे सुमारे १५ ते २० उद्योग गॅसअभावी बंद पडले आहेत. तसेच वेल्डिंग उद्योगालाही याचा परिणाम जाणवत आहे. याशिवाय केटरिंग व्यवसायावरही गॅस टंचाईचे संकट ओढवले आहे. अनेक केटरर्स लहान कार्यक्रमांच्या ऑर्डर्स स्वीकारत असले तरी मोठ्या कार्यक्रमांसाठी ग्राहकांनी स्वतः गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी अट घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in