जळगाव : अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या जालना-जळगाव रेल्वे मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सात हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठा लेणीपर्यंत जलद प्रवास होणार आहे, तर मराठवाड्याची गुजरात आणि मध्य प्रदेशसोबतची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे.
दोन वर्षांपूर्वी या मार्गाची घोषणा करण्यात आली होती. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी फायनल लोकेशन सेवेला मान्यता दिली होती अंतिम सर्वेचा अहवाल सप्टेंबर २०२२ ला रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता.
शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मान्यता दिली. या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याची गुजरात आणि मध्य प्रदेशसोबतची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. या प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
६० लाख जणांना रोजगार
सात हजार १०६ कोटींच्या या प्रकल्पासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षीच ५० टक्के खर्चाची तरतूद केली असून उर्वरित ५० टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. १७४ किमी लांबीचा हा मार्ग असून त्यावर २२ स्टेशन असतील. या मार्गावर ३ मोठे तर १३० लहान पुलाचा समावेश आहे. तसेच या मार्गासाठी ९३५ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. या मार्गामुळे अजिंठा लेणीपर्यंतचा प्रवास हा सुसाट होणार आहे. यातून ६० लाख जणांना रोजगार मिळेल.