Jalgaon News : जळगावमध्ये ९२,००० ‘लाडक्या बहिणी’ अपात्र? अडकल्या चौकशीच्या फेऱ्यात; अंगणवाडी सेविका घरोघरी करणार सर्वेक्षण

लाडकी लेक योजनेंतर्गत एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत का, याचा शोध राज्य शासनाने सुरू केला असून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ‘लाडक्या बहिणी’ या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या निकषांनुसार वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

जळगाव : लाडकी लेक योजनेंतर्गत एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत का, याचा शोध राज्य शासनाने सुरू केला असून जळगाव जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार ‘लाडक्या बहिणी’ या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. राज्य शासनाच्या नव्या निकषांनुसार वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात आदेश प्राप्त झाले असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. अर्जांची तपासणी न करता मोठ्या प्रमाणावर मंजुरी देण्यात आली. अनेक घरांतील एकापेक्षा अधिक महिलांनी अर्ज भरले. त्यामुळे या योजनेचा आर्थिक भार मोठा झाला. विरोधकांनीही या योजनेवर तीव्र टीका केली. या निकषांनुसार एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी नसावेत, लाभार्थीचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असावे, लाभार्थीचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असलेली प्रकरणे ७५,६९५ आहेत. २१ वर्षांखालील लाभार्थी १२,०४१ तर ६५ वर्षांवरील ५,०४९ आहेत. वयोमर्यादेच्या निकषात न बसणारे सर्वाधिक लाभार्थी जामनेर तालुक्यात असून त्यांची संख्या १,९५३ आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव १,८७२, अमळनेर १,८४९, जळगाव १,६५७, चोपडा १,४९५, पारोळा १,४०१, यावल १,३४२ असून सर्वात कमी बोदवड तालुक्यात ३२५ लाभार्थी आहेत. आता जिल्हाभरात अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन सर्वेक्षण करणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून कळविण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in