

जळगाव: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले असून आता निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार उरले आहेत. वैध ठरलेल्या १६ उमेदवारांपैकी १२ जणांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्चना मोरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते.अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या अनेक अपक्ष उमेदवारांना माघारीसाठी मनधरणी करण्यात आली. त्यानंतर १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे आता जळगाव विधान परिषद निवडणुकीत खरी रंगत निर्माण झाली असून महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महायुतीकडून भाजपचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि प्रहार जनशक्ती पक्षाशी संबंधित अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात थेट सामना रंगणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गटातील प्रमुख नेते अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. जिल्ह्यात भाजपबरोबरच शिवसेनेनेही आपली ताकद वाढविल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही जागा आपल्या पुत्र प्रताप पाटील यांच्यासाठी मागितल्याची चर्चा होती. तसेच पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनीही आपल्या पुत्रासाठी उमेदवारीची मागणी केली होती. जरी त्यांनी नंतर आग्रह सोडला असला तरी अखेरपर्यंत गुलाबराव पाटील हे जागेबाबत आशावादी असल्याचे बोलले जात होते. अखेर ही जागा भाजपकडे गेल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे मानले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना असल्याची चर्चा असून त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
दुसरीकडे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे भुसावळचे माजी नगराध्यक्ष असून त्यांच्या पाठीशी सुमारे ११० मतदारांचे संख्याबळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ते निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनीही प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांवर सर्वच उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग येणार असून जळगाव विधान परिषद निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
१८ जून रोजी मतदान होणार असून जिल्ह्यात सात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
रोहन घुगे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी