

जळगाव : लग्नानंतर माहेरी निघालेल्या नवविवाहितेचा सोमवारी जळगाव शहरात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला, तर तिला माहेरी घेऊन जाण्यास आलेले तिचे काका या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील हिचा विवाह ७ जुलै रोजी पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते.
सोमवारी वैशाली हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील हे जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला तर काका प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सासरचे व माहेरचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. नवविवाहितेच्या अकाली निधनामुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे.