जळगाव पोलिसांनी रोहिणी खडसेंना घेतलं ताब्यात ; एकनाथ खडसे म्हणाले, "ही तर..."

कापूसच्या प्रश्नावरुन शिंदे-फडणवीस यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिला होता
जळगाव पोलिसांनी रोहिणी खडसेंना घेतलं ताब्यात ; एकनाथ खडसे म्हणाले, "ही तर..."

आज 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला होता. खडसे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर जळगाव पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि महानगर प्रमुख अशोक लाड वंजारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. रोहिणी खडसेंना ताब्यात घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून पोलिसांची ही दडपशाही सुरु आहे. वास्तविक त्या ठिकाणी कोणीही काळे झेंडे दाखवले नाहीत किंवा ते रस्त्यावरही उभे नव्हते. ताब्यात घेण्यात आलेली मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसली होती. असं असताना पोलिसांनी कार्यायलात धुडगूस घालून रोहिणी खडसेंना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांना जबरदस्तीने उचलून नेलं. हे काय सुरु आहे? हुकूमशाही आहे का? असं खडसे म्हणाले आहेत.

रोहिणी खडसेंना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कापूसच्या प्रश्नावरुन शिंदे-फडणवीस यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी दिला होता. याप्रकरणी खबरदारी म्हणून पोलिसांकडून रोहिणी खडसे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in