जळगावात वाळूमाफीयांची मुजोरी; उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

जळगावात वाळूमाफीयांची मुजोरी; उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

एका कारमधून आलेल्या वाळूमाफीयांनी जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या गाडीवर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने हल्ला चढवला

जळगाव : मंगळवारी रात्री साडे ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर एका कारमधून आलेल्या वाळूमाफीयांनी जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या गाडीवर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने हल्ला चढवला यात सोपान कासार यांना डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यावर हल्लेखोर पसार झाले.

जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा बंदी असली, तरी मोठया प्रमाणावर राजकीय कृपेने अवैध वाळू उपसा होत आहे. मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकी विरोधात कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तहसीलदार विजय बनसोडे अन्य दोन जण शासकीय वाहनाने गेले होते. त्यांना दोन अवैध वाहतूक करणारे दोन डंपर दिसले. यापैकी एक ताब्यात घेतला, तर दुसरे न थांबता निघून गेले या पळून जात असलेल्या डंपरचा पाठलाग करण्यात आला. यावेळी एका कार मधून सात ते आठ वाळू माफीया आले व त्यांनी सोपान हे बसलेल्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. यात सोपान कासार यांना डोक्याला रॉड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रूग्णालयात धाव घेतली. हल्लेखोरांच्या शेाधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. बुधवारी या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना अटक करण्यात येऊन त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in