सोन्याच्या हव्यासापायी स्मशानातील अस्थी गायब; अंत्यसंस्कारानंतर मृत महिलेच्या अस्थींची चोरी, जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगावच्या मेहरूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृत महिलेच्या अस्थी चोरी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी चोरट्यांना विनंती केली आहे की, सोने परत करू नका, पण आईच्या अस्थी तरी परत करा.
सोन्याच्या हव्यासापायी स्मशानातील अस्थी गायब; अंत्यसंस्कारानंतर मृत महिलेच्या अस्थींची चोरी, जळगावमधील धक्कादायक प्रकार
Published on

जळगाव : जळगावच्या मेहरूण स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृत महिलेच्या अस्थी चोरी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी चोरट्यांना विनंती केली आहे की, सोने परत करू नका, पण आईच्या अस्थी तरी परत करा.

गायत्री नगरात राहणाऱ्या राजेंद्र पाटील यांच्या आई छबाबाई काशिनाथ पाटील यांचे रविवारी निधन झाले. छबाबाईंनी आपल्या इच्छेनुसार सांगितले होते की, “माझे दागिने माझ्यासोबतच जावेत.” ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलांनी छबाबाईंच्या दागिन्यांसह त्यांचे अंत्यसंस्कार केले.

मंगळवारी अस्थी संकलनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता, अंत्यसंस्कार केलेल्या ओट्यावरून अस्थी गायब होत्या आणि केवळ राख शिल्लक राहिल्याचे आढळून आले. या घटनेमुळे स्मशानात गेलेल्या सर्व नातेवाईकांसह इतरही उपस्थित व्यक्ती हादरले. राजेंद्र पाटील यांच्या मुलांनी सांगितले की, दागिने गेल्याचे दु:ख नाही, मात्र आईच्या अस्थी चोरीला गेल्याने भावनिक वेदना झाल्या आहेत. आणि त्यांनी चोरट्यांना भावनात्मक आवाहन केले, “आईच्या अस्थी परत करा.”

मेहरूण स्मशानभूमी ही जळगाव महापालिकेच्या नियंत्रणाखाली आहे. येथे सुरक्षेची कोणतीही योग्य सोय नाही; सुरक्षा रक्षक नाहीत आणि स्मशानभूमीला कुंपणदेखील नाही. महापालिकेच्या उदासीन कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राजेंद्र पाटील यांनी मागणी केली आहे की, यापुढे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तात्काळ सुरक्षारक्षक नेमले जावेत. या अस्थी चोरीच्या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in