

जळगाव : पिंप्राळा पुलाजवळील निर्जन आणि अस्वच्छ परिसरात टाकून दिलेल्या अवघ्या दहा दिवसांच्या बालिकेचे प्राण एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे वाचले. मुंग्या चावत असलेल्या या अर्भकाला सुरक्षित ठिकाणी हलवून त्याने पोलिसांना माहिती दिली. शिवाजी मधुकर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.
पिंप्राळा पुलालगत मृत जनावरे टाकली जात असल्याने परिसर अस्वच्छ आहे. याच ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने रात्री बालिकेला टाकून दिले होते. हरिविठ्ठल नगर येथे रंगकाम करणारे शिवाजी गायकवाड या परिसरातून जात असताना त्यांना बालिका दिसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तिला सुरक्षित ठिकाणी नेले आणि पोलिसांना कळवले.
पोलिसांनी बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन बालिकेची माहिती घेतली. तिच्या पुढील देखभालीसाठी वैद्यकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीशी चर्चा करण्यात आली. बालिका सध्या शासकीय रुग्णालयात सुरक्षित असून तिची काळजी घेतली जात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, बालिकेच्या पालकांचा शोध सुरू आहे. शिवाजी गायकवाड यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.