
विजय पाठक/जळगाव
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ आग लागल्याच्या अफवेमुळे पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी लोहमार्गावर उड्या घेतल्या, मात्र समोरून आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली अनेकजण चिरडले गेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. त्यामध्ये १३ जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, जखमींना जळगाव व पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वे अपघातानंतर बुधवारी रात्री सर्व मृतदेह जळगावला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. जळगावला प्रथमच रात्री शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सात जणांची ओळख पटवण्यात यश आले होते, तर गुरुवारी आणखी चार अशा ११ जणांची ओळख पटली आहे. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटलेल्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मृतांपैकी चार जण नेपाळमधील
मृतांपैकी सात जण उत्तर भारतातील असून चार जण नेपाळचे आहेत. पुण्यातील तीन आणि भिवंडीतील एक जण असल्याने त्यांच्यावर पुणे व भिवंडीत अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
अपघातस्थळी मृतांच्या नातेवाईकांनी गुरुवारी भेट दिली आणि त्यांच्या चीजवस्तू, कपडे सापडतात का, याचा शोध घेतला. तर आणखी काही मृतदेह आहेत का, याचा शोध श्वानपथकाच्या मदतीने घेण्यात आला. गुरुवारी सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सायंकाळी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी जळगाव आणि पाचोरा येथे रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
मृतांची नावे
कमला नवीन भंडारी (४३, नेपाळ), लच्छीराम खाटू पासी (४०, नेपाळ), इम्तियाज अली (३५), गगराम (उत्तर प्रदेश), नसुरुद्दीन बदरुद्दीन सिद्दीकी (१९, जि. गोंडा उत्तर प्रदेश), बाबू खान (२७, कांडोसा, उत्तर प्रदेश), हिनू नंदराम विश्वकर्मा (११, नेपाळ), जावकला भाटे जयकाडी (६०, नेपाळ), नोकला भट्टू (६०, जयवाडी).