
विजय पाठक/जळगाव
लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे परधाडे रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून कर्नाटक एक्स्प्रेस आल्याने त्याखाली चिरडून १२ प्रवासी ठार, तर ७ प्रवासी जखमी झाले. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघाताची रेल्वेसुरक्षा आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे
लखनौ-मुंबई पुष्पक सुपरफास्ट एक्स्प्रेसने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर ती मुंबईस जाण्यास निघाली. गाडीतील प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळी ४.३० वाजता पाचोरा स्टेशनच्या आधी १० किमीवर परधाडे स्टेशनजवळ गाडीने ब्रेक लावल्याने चाके रूळावर घासली जाऊन ठिणग्या उडाल्या. गाडीतील काही प्रवाशांनी ते पाहिले व आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे गाडीतील काही घाबरलेल्या प्रवाशांनी गाडीतून दोन्ही बाजूने ट्रॅकवर उड्या मारल्या. याच वेळेस बंगळुरूहून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून हे प्रवासी चिरडले गेले. यात १२ जण ठार झाले, तर ७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर रेल्वे ट्रॅकवर सर्वत्र मृतदेह व मानवी शरीरांचे तुटलेले अवयव दिसून येत होते. हे दृष्य अत्यंत भीषण व मन हेलावणारे होते.
अपघाताचे वृत कळताच परधाडे गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले. रेल्वे कंट्रोल रूमकडून माहिती येताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा प्रशासनाचे अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रेल्वेच्या दोन रिलीफ व्हॅन रवाना झाल्या. प्रशासनाकडून आठ रूग्णवाहिका, अग्निशमन गाड्या, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. जखमींना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत शासनाकडून जाहीर केली. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या अपघाताची माहिती घेत सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.