

जळगाव : जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान रहिमखान पठाण (२१) या तरुणाच्या जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर काही दिवस तणावग्रस्त झालेली जामनेरची परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
११ ऑगस्ट रोजी सुलेमान एका मुलीसोबत बसलेला असताना, संशयावरून काही जणांनी त्याला जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी सुलेमानच्या वडिलांनी १० ते १५ जणांविरोधात फिर्याद दाखल केली. घटनेनंतर जामनेर शहरात तणाव निर्माण झाला. काहींनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आणि दुकाने बंद ठेवली. परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होऊन कार्यवाही सुरू केली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल.