
संजय करडे/ मुरूड-जंजिरा
जसा पावसाळा जवळ येतो, तसा समुद्र रौद्ररूप धारण करत असल्याचे चित्र वर्षानुवर्ष पहावयास मिळते. यावेळी किनारी भागात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याचे दिसून येते. अशावेळी पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव मुरूड तालुक्यातील राजपुरी बंदराजवळील समुद्रात असणारा ऐतिहासिक जंजिरा किल्ला दरवाजे २६ मेपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. परंतु रविवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने रविवारपासूनच जंजिरा किल्ला येथील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी जेट्टीवरून शिडाच्या बोटीद्वारे पर्यटकांची वाहतूक केली जाते. या शिडाच्या बोटींची वाहतूक देखील महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून बंद केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना रविवारपासूनच जंजिरा किल्ला पाहण्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी यांनी सुद्धा एक पत्र काढून समुद्रात चालणारी कोणतीही जलवाहतूक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्रात चालणारे वॉटर स्पोर्ट २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे समुद्रातील सर्व वाहतूक बंद राहणार आहे.
समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग २६ मेपासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो. २६ मेपासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत, अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्त्व खात्याला प्राप्त झाले आहेत. आज ही खराब वातावरणामुळे किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. उद्या ही खराब हवामान असेल तर किल्ला बंद ठेवण्यात येईल, यांची नोंद पर्यटकांनी घ्यावी. - बजरंग येलीकर, संवर्धक सहाय्यक पुरातत्त्व संशोधन विभाग