जि.प. शाळा विजयनगरची मुले जपानी भाषेत निपुण; विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे

लहान वयात मुलांना एक वेगळी परदेशी भाषा शिकण्याची संधी बालाजी जाधव यांच्या कल्पक शिक्षकामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
जि.प. शाळा विजयनगरची मुले जपानी भाषेत निपुण; विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे

(अरविंद जाधव)

सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि. प. शाळा विजयनगर आणि तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचे विश्व खुले करणारे ठरताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील पहिली ते चौथीचे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.

बालाजी जाधव यांनी सांगितले की, "आज समाजातील खूप सारे युवक पदवीनंतर परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करतात. पण, त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना नामी संधी मिळत नाही. पण, विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना भविष्यात अशा समस्या येऊ नये, म्हणून प्राथमिक शाळेतच जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली. अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज झाले आहेत."

"पहिले २ ते ३ आठवडे आम्ही विद्यार्थ्यांना युट्युबवरील जपानी भाषेचे व्हिडिओ दाखवून, त्यांचे ऐकणे व पाहणे अशी सुरुवात केली. काही साधारण गोष्टी त्यांना समजू लागल्यानंतर जपानी भाषेतील संवाद दाखवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनाही यामध्ये मजा येऊ लागल्याचे जाणवू लागले. जपानी भाषेत ३ प्रकारच्या लिपी असतात. त्यामधील हिरागाना नावाची लिपी आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यामधील ५-५ अक्षरे शिकवून त्याचे वाचन आणि लेखन आम्ही फावल्या वेळेत घेवू लागलो. प्रामुख्याने डीयूलींगो या appचा व युट्युबचा आम्हाला यामध्ये खूप फायदा झाला. एखादी बाब मी २ ते ३ दिवसात शिकलो तर विद्यार्थी मात्र एका दिवसात ते शिकायचे हा अनुभव मला शिक्षक म्हणून आला. विशेषतः इयत्ता पहिलीचे विद्यार्थी खूप सहजतेने शिकताना दिसत होते. २ महिन्यात आम्ही मिळेल तसा वेळ यासाठी देवून अक्षरे, अंक, वाचन,लेखन, संवाद या सर्व बाबी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकलो." असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "कोणतीही भाषेचे वाचन व लेखन हे ऐकून आणि संभाषण करून उत्तम शिकता येते. मग आम्ही छोटे छोटे संवाद ४ ते ५ ओळीचे गटागटाने घ्यायला सुरुवात केली. या पद्धतीने खूप कमी वेळात शिकायला लागलो. मग अक्षरापासून छोटे शब्द तयार करून त्याचे वाचन करणे, जपानी लिपीत छोटे छोटे शब्दांचे लिखाण करणे, यामुळे चांगली गती येवू लागली. साधारण ४ महिन्याचा या सर्व बाबी शिकण्यास वेळ लागला. यानंतर आम्ही अंक व गणिते यावर भर देवून सर्व अंक मराठी व जपानी भाषेत वाचन, लेखन करण्यास शिकलो. आजच्या घडीला सर्व विद्यार्थी नुसते अंक ओळखतच नाहीत, तर जपानी भाषेत त्याचे लिखानदेखील करतात. पण त्यापलीकडे जपानी भाषेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सुद्धा करत आहेत." असे ते म्हणाले.

"कोणताही जपानी माणूस आता बोलताना दिसला, तर १०० टक्के आमच्या विद्यार्थ्यांना ते आत्ता समजू शकते. परदेशी भाषा शिकण्यासाठी एकीकडे हजारो रुपये शिकवणी वर्गासाठी लोक घालवतात. मात्र इतक्या ग्रामीण भागात ही मुले अशी अभिनव शिकत असल्याने पालक खूप खुश आहेत. काहीतरी वेगळं शिकायला मिळत असल्याने त्यांना आनंद व अभिमान आहे. प्रत्येक विद्यर्थ्याला जपानी साठी एक वेगळी वही शाळेतून दिली जाते. त्यामध्ये त्याचा सराव करतात." असे ते म्हणाले. इतक्या लहान वयात मुलांना एक वेगळी परदेशी भाषा शिकण्याची संधी बालाजी जाधव यांच्या कल्पक शिक्षकामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in