"जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध...पानी का पानी होईल", ओबीसी नेत्याचे आव्हान

आम्ही संविधानाची भाषा बोलतो. सामाजिक न्यायाची भाषा बोलतो. आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकाची भाषा आम्ही बोलतोय. कोर्टात आपण...
"जरांगे कोर्टात भेटू, दूध का दूध...पानी का पानी होईल", ओबीसी नेत्याचे आव्हान

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढल्यानंतर ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेवर तीव्र हरकती दाखल करण्याचे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केले. ओबीसी नेत्यांनी याचिका दाखल केली तर आपणही मंडल कमिशनला चॅलेंज करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना कोर्टात येण्याचे आव्हान केले आहे. "मनोज जरांगे-पाटील आता न्यायालयात भेटू, दूध का दूध... पानी का पानी करू", असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

"आम्ही संविधानाची भाषा बोलतो. सामाजिक न्यायाची भाषा बोलतो. आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकाची भाषा आम्ही बोलतोय. कोर्टात आपण जरूर भेटू, एकदा दूध का दूध... पानी का पानी होईल. जरांगे तुमचे स्वागत आहे तुम्ही या", असे आव्हान हाके यांनी जरांगे यांना दिले.

"एकीकडे ओबीसीतून आरक्षण मागायचे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करायचे, अशी मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका आहे. हे दोन्ही विरोधीभास वक्तव्य नाहीत का? तुझ्याकडून ती औकातच नाही. त्यामुळे तू कोर्टात येच, तसेही खोटारडेपणा करून तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन करून घुसखोरी करत आहात. तुम्ही खोटारडेपणा केला आहेच", असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

"आमच्या आरक्षणाला विरोध जर तुम्ही विरोध केला, तर आम्ही ओबीसी आरक्षणाला न्यायालयात चॅलेंज करुन तुमचे आरक्षण रद्द करणार, असे मनोज जरांगे म्हणतात. मनोज जरांगे तुला गोरगरिब मराठा समाजाच्या पोरांचे पडलेले नाही. आरक्षणाच्या माध्यामातून आणि संविधानाच्या माध्यमातून जी प्रतिनिधित्वाची भाषा बोलली जाते ती तुला संपवायची आहे, असा आरोपही हाके यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे उल्लंघन केले-

लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानीक पदावर राहून आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचे दायित्व त्यांच्याकडे असतानाही त्यांनी काययद्याचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचेही उल्लंघन केले आहे. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हते. असे हाके म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत काही दगाफटका झाल्यास मी मंडल कमिशनला चॅलेंज करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना दिला. ओबीसी नेत्यांनी फक्त ही याचिका दाखल करुदेत मीही मंडल कमिशनला चॅलेंज करणार. मी आहे तोपर्यंत पुन्हा मराठ्यांसाठी लढा उभा करेन, असे जरांगे पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in