जरांगे-पाटील आज पुण्यात

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर टप्प्याटप्प्याने वळविण्यात येणार आहे.
जरांगे-पाटील आज पुण्यात

पुणे : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे-पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर टप्प्याटप्प्याने वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशीन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जातील. वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे. तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरूरमार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे. पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरूरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

बुधवारी (२४ जानेवारी) सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. तेथून पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. थेऊर फाटा, केसनंद, थेऊरमार्गे वाहतूक सोलापूर रस्त्याने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in