जालना : राज्यातील एका मंत्र्याने आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सलाईनद्वारे द्रवपदार्थ घेण्यास सुरुवात केली. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता.
तथापि, सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही तर सलाईनद्वारे द्रवपदार्थ घेणे थांबविण्यात येईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली.
राज्यातील एका मंत्र्याने आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आपण सलाईनद्वारे द्रवपदार्थ घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सरकारने तातडीने प्रश्न सोडविला नाही तर द्रवपदार्थ घेण्याचे थांबविण्यात येईल आणि त्या मंत्र्याचे नावही जाहीर केले जाईल, गेल्या दहा वर्षांपासून आम्ही आंदोलन करीत आहोत, त्यांनी आता आमचा अंत पाहू नये, असेही त्यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात आला नाही तर विधानसभेच्या २८८ मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील आणि त्यानंतर आम्ही आरक्षण देणारे होऊ, घेणारे नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.