जरांगे-पाटील यांची आज मुंबईकडे कूच; मराठवाड्यातील आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल

जरांगे-पाटील यांची आज मुंबईकडे कूच; मराठवाड्यातील आंदोलक अंतरवाली सराटीत दाखल

जरांगे- पाटील यांच्या दिंडीत सामिल होण्यासाठी मराठवाड्यातून हजारो युवक आणि मराठा आंदोलक शुक्रवारीच अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले

मुंबई : मराठा आरक्षणासाठी खंबीरपणे लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता मुंबईकडे जाण्याचा पक्का निर्धार केला असून, शनिवार, दि. २० जानेवारी रोजी ते मराठा आंदोलकांसह मुंबईकडे पायी रवाना होणार आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीत मराठवाड्यातील मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. राज्य सरकारने जरांगे-पाटील यांच्या मागण्या गंभीरपणे घेत एक-एक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्य सरकारच्या केवळ घोषणाच आहेत. प्रत्यक्षात कृती फारशी दिसत नसल्याचे जरांगे-पाटील यांचे म्हणणे आहे.

जरांगे-पाटील यांची शनिवारी अंतरवालीतून पायी दिंडी निघणार आहे. त्यांनी मुंबईकडे जाण्याचा कार्यक्रम अगोदरच जाहीर केला असून, ज्यांना पायी येणे शक्य आहे, त्यांनी पायी निघावे आणि ज्यांना अशक्य आहे त्यांनी वाहनातून यावे, असे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

आता जरांगे- पाटील यांच्या दिंडीत सामिल होण्यासाठी मराठवाड्यातून हजारो युवक आणि मराठा आंदोलक शुक्रवारीच अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आतापर्यंत बरेच आंदोलक अंतरवालीत दाखल झाले असून, अनेक आंदोलक रस्त्यावर जात असताना दिंडीत सामिल होणार आहेत. त्यामुळे जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने सामिल होऊ शकतात. जसजशी दिंडी मुंबईच्या दिशेने पुढे सरकेल, तसा जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे आंदोलन हाताळण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. मराठवाड्यातून अनेक युवक जरांगे-पाटील यांच्या दिंडीत सामिल होण्यासाठी गाड्या घेऊन रवाना झाले. सर्व लवाजम्यासह हे युवक जात आहेत. त्यामध्ये बिस्कीट पुडे, अन्नधान्य, पाणीही सोबत घेतले आहे. मुंबईत थांबण्याची वेळ आल्यास अन्नधान्य कमी पडू नये, याची तयारी या आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आंदोलन कितीही दिवस चालले तरी माघार नाही, या निर्धारानेच आंदोलक जरांगे-पाटील यांच्या दिंडीत सामिल होण्यासाठी अंतरवालीत दाखल झाले आहेत. मराठा समाजाला टिकावू आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येणार आहे. सध्या कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मराठा समाजाचा अभ्यास करण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने नेमला आहे. फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनबाबत विंडो ओपन झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

फसवणूक होऊ देणार नाही

मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होऊ देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राबाबत नव्याने मसुदा तयार करण्याचा विषय आमच्या डोक्यात नाही. नोंदीचे प्रमाणपत्र मिळतील, तेव्हाच सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला अर्थ आहे. सुरुवातीला उपोषण सोडण्यासाठी आलेले सरकारच्या शिष्टमंडळातील ६-७ जण कुठे गेले, असा सवाल उपस्थित करीत जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले नाही, तर मी मुंबई सोडणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in