जरांगे-पाटील रुग्णालयात उपोषणामुळे प्रकृती खालावली

अंतरवाली सराटी येथे २९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे-पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते
जरांगे-पाटील रुग्णालयात उपोषणामुळे प्रकृती खालावली

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल १६ दिवस उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधीच व्याधीग्रस्त असलेल्या जरांगे-पाटील यांची तब्येत दीर्घकाळ उपवास केल्यामुळे खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, तपासण्यांकरिता त्यांना रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून अंतरवाली सराटी येथून रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले होते. त्यावेळी त्यांची उपोषण स्थळीदेखील वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. ‘मी आंदोलनस्थळीच उपचार घेतो,’ असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले होते. मात्र, नंतर सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे अखेर ते रविवारी रुग्णालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीप्रमाणे जरांगे-पाटील सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना झाले होते.

साखळी उपोषण सुरूच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे २९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे-पाटील व त्यांचे सहकारी उपोषण करत होते. अखेर १७ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडले. मात्र, मराठा आरक्षणासाठी अंतवाली सराटी येथे साखळी उपोषण सुरूच आहे. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर जरांगे-पाटील ठाम आहेत.

logo
marathi.freepressjournal.in