हक्काचे आरक्षण द्या, अन्यथा वाईट परिणाम!जरांगे-पाटील यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्यावे
हक्काचे आरक्षण द्या, अन्यथा वाईट परिणाम!जरांगे-पाटील यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

राजा माने/मुंबई : मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्यावे. सोबतच त्याआधारे मराठा समाजाला सरसकट हक्काचे आरक्षण द्यावे अन्यथा तुम्ही वेगळा प्रयत्न केल्यास वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिला. जरांगे-पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले असून, रविवारी ते अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले. या दुसऱ्या दिवशी आंदोलकांची संख्या वाढल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. दरम्यान, सरकार जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करीत आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (पान १ वरून) मराठा आरक्षणासाठी आता जरांगे-पाटील यांनी लढा तीव्र केला असून, आता ते मुंबईच्या दिशेने निघाल्याने मराठा बांधवही मोठ्या संख्येने त्यांच्यासेबत पदयात्रेत सहभागी झाले आहेत. रविवारी माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारला गेल्या ७ महिन्यांपासून सातत्याने वेळ देत आहे. याअगोदर दोन वेळा सरकारने आश्वासन दिले, म्हणून मी माघार घेतली. मात्र, सरकारने दिलेल्या मुदतीत काहीच केलेले नाही. आरक्षण असूनही मराठी समाजाला ते मिळत नाही. आता एवढ्या नोंदी सापडत आहेत. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. अशा स्थितीतही सरकार वेळच मागत असेल, तर मराठा समाज आता थांबू शकत नाही. आता तर आरक्षण घेऊनच अंतरवालीत परतणार आहे, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

मी मरणालाही भीत नाही

माझ्यामागे मराठा समाज भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे मी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाजाला यापुढे आरक्षण मागायची गरज पडू नये, म्हणून मी लढत आहे. मराठा समाज माझ्यासोबत असल्याने मी घाबरत नाही. त्यामुळे सरकारने धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. असे सांगताना मी मरायला कधीही भीत नाही. त्यामुळे आरक्षण कसे मिळत नाही ते मुंबईत आल्यावर बघतो, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

अजूनही वेळ गेलेली नाही

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय तात्काळ घ्यावा. सरकारला आतापर्यंत ७ महिन्यांचा वेळ दिलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही मुंबईला येईपर्यंत निर्णय घ्यावा. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घालायला हवे अन्यथा तुम्हाला अजिबात वेळ देणार नाही, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

जरांगेंनी आंदोलन थांबवावे-मुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला टिकावू आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मनोज जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्य सरकार काम करीत आहे. राज्य सरकार कुणबी नोंदी शोधत आहे. मोठ्या प्रमाणात नोंदी सापडत असून, प्रमाणपत्रही वाटप सुरू आहे. तसेच मागासवर्ग आयोगही आरक्षणाच्या दृष्टीने कामाला लागला आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

logo
marathi.freepressjournal.in