राजा माने/मुंबई : मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी सगेसोयरेसंबंधीच्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी लावून धरली आहे. परंतु आता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भाषा करत आहे. त्यावर आता जरांगे-पाटील यांनी आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिले जाणार असले, तरी ज्या व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी त्यासंबंधीच्या अधिसूचनेची २० फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलनातून माघार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला सगेसोयरेसंबंधीच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. जोपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत सरकार म्हणून तुम्हाला सुटी नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. सरकारकडून मराठ्यांना आरक्षण मिळेल, याबद्दल मराठा समाजाला विश्वास आहे. त्यामुळे विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारी रोजी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होऊ शकते. तसेच यावेळी एकमताने ठराव घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीची घोषणा केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देता हे आरक्षण देण्यात येईल, असे सांगितले. राज्य मागासवर्ग आयोगाने शुक्रवारी राज्य सरकारकडे अहवाल सुपूर्द केला. त्यामुळे आता सरकार २० फेब्रुवारी रोजी मोठी घोषणा करू शकते. मात्र, हे करीत असताना सगेसोयरेच्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.
नोंदी सापडल्या, त्यांना आरक्षण द्या!
राज्यात मराठा समाजातील अनेक कुटुंबीयांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांना आणि सग्यासोयऱ्यांना कुणबी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने यासंबंधीच्या अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. अर्थात, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्यासाठी सगेसोयऱ्यांचा कायदा करावाच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.
राणेंना इशारा
नारायण राणेंचे वय झाले आहे. त्यामुळे मी त्यांचा आदर करतो. माझ्या भावना समजत असतील तर समजून घ्या, नाहीतर मी पुरता पाणउतारा करत असतो. ही शेवटची संधी आहे. मला काही मर्यादा आहेत. पण मी कचाट्यात आल्यावर धुवून काढीन, असा निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिला.
जरांगेंच्या जीवाला धोका
जरांगे-पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना दिली जाणारी औषधे, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.