जरांगेंनी केले फडणवीसांना लक्ष्य!

मराठा समाजाला आहे तसे आरक्षण द्यायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. मुळात कुणीही त्यांच्या पुढे गेलेले त्यांना कधीच आवडत नाही.
जरांगेंनी केले फडणवीसांना लक्ष्य!

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच षड‌्यंत्र आहे. आपल्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून गृहमंत्र्यांना आपले 'एन्काऊंटर' करावयाचे आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी केला.

मराठा समाजाला आहे तसे आरक्षण द्यायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. मुळात कुणीही त्यांच्या पुढे गेलेले त्यांना कधीच आवडत नाही. राज्यात त्यांच्या परवानगीशिवाय काहीच होत नाही. मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे त्यांचेच षड‌्यंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला आता मी सोडणार नाही. मी थेट 'सागर' बंगल्यावर येऊन आंदोलन करेन. तुम्हाला गोळ्या घालायच्या असतील, तर घाला. परंतु मी खोटे आरोप सहन करणार नाही आणि सगेसोयरेचे आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर अंतरवाली सराटी येथून जोरदार हल्लाबोल केला. यानंतर जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले आणि प्रथमोपचार घेण्याची विनंती केली.

सगेसोयरेची अधिसूचना राज्य सरकारने काढावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच त्यांनी याच मागणीसाठी २४ फेब्रुवारीपासून राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन आंदोलकांना केले. त्यामुळे राज्यात आता ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात २० फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मंजूर झाल्यानंतर, सुरुवातीपासून आपल्यासमवेत असलेल्या सहकाऱ्यांना, त्यानंतर आपल्या चुका अचानक कशा निदर्शनास आल्या आणि ते आपल्याविरुद्ध जाहीर भूमिका कशी घेऊ लागले, असे शंकायुक्त सवाल जरांगे यांनी उपस्थित केले. गृहमंत्री फडणवीस यांनी काही लोकांना फूस लावून आणि त्यांच्यावर दबाव आणून आपल्यावर आरोप करण्याचे षड‌्यंत्र रचले आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला.

अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीनंतर जरांगे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जवळपास एका तास भाषण केले. त्यावेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे कार्यकर्तेही हबकून गेले आहेत.

जरांगे यांनी केलेल्या आरोपांनंतर बैठकीच्या ठिकाणी जमलेले त्यांचे कार्यकर्ते स्तंभित झाले. त्यापैकी काही जणांनी त्यांच्या हातातील माइक काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण मुंबईकडे एकट्यानेच कूच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला आधारासाठी केवळ एका काठीचीच गरज आहे, असे ते म्हणाले.

फडणवीस यांच्या ब्राह्मणी डावपेचांचाही यावेळी जरांगे यांनी उल्लेख केला, मात्र हे विधान सरसकट ब्राह्मणांसाठी नसल्याचेही सांगण्यास जरांगे विसरले नाहीत. फडणवीस यांना त्यांच्यापेक्षा कोणी अधिक लोकप्रिय झाल्याचे सहन होत नाही. मराठा समाजाचे कार्यकर्ते शांततेत आंदोलन करीत असतानाही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदविल्या. न्यायालयाने शांततेत आंदोलन करण्याची परवागी दिली असतानाही तक्रारी का नोंदविण्यात आल्या, असा सवालही जरांगे यांनी केला.

फडणवीस यांना कुणी त्यांच्या पुढे गेलेले आवडत नाही. त्यामुळेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांनी काय दशा केली, याचा अंदाज आपल्याला येतो, अशा शब्दांत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. यावेळी जरांगे यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे, महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून कधीच बाहेर पडले नसते, परंतु त्यांना धाक दाखविण्यात आला, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनाही कारागृहाचा धाक दाखविण्यात आला, असे जरांगे म्हणाले.

मराठा समाजाच्या हितासाठी मी उपोषण सुरू केले. जोपर्यंत मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही. माझे उपोषण सुरू असताना मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच मी सलाईन काढून फेकून दिले. फडणवीस हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माझ्याविरोधात षड‌्यंत्र रचत आहेत. परंतु आम्ही समाजहितासाठी लढत आहोत. मला समाजापासून कोणीही तोडू शकत नाही. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये, असे जरांगे म्हणाले.

मी कुठल्याही पक्षाचा नाही

मी एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, म्हणून मी लढत आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही किंवा माझा काही स्वार्थही नाही. परंतु माझा लढा संपविण्यासाठी कारस्थान केले जात आहे. परंतु मी थांबणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

सागर बंगल्यावर येतो, माझ्यावर गोळ्या घाला 

आता मी थेट सागर बंगल्यावर आंदोलन करणार आहे. आता मला कोण अडवतो ते पाहतो, असे सांगत जरांगे म्हणाले की, मला संपविण्याचा डाव रचला जात आहे. त्यामुळे आता मी तिथे येऊन आंदोलन करणार आहे. तुम्ही मला गोळ्या घालणार असाल, तर घाला. मी अजिबात घाबरत नाही आणि खोटे आरोपही सहन करणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

जरांगेंचा बोलवता धनी वेगळाच -राणे

जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर टीका करताना भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की, फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जरांगे यांना प्रथम पक्ष कार्यकर्त्यांची मोठी भिंत ओलांडावी लागेल. ज्या पद्धतीने जरांगे आरोप करीत आहेत त्यावरून त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे स्पष्ट होते आहे, असे राणे म्हणाले. मनोज जरांगे राजकारणात यावे, परंतु इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करू नयेत, असे राणे म्हणाले. तर जरांगे यांचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आला आहे, असे भाजपचे आमदार

आरोपांच्या फैरी

सलाईनमधून माझ्यावर

विषप्रयोगाचा प्रयत्न

माझे 'एन्काऊंटर' करण्याचा डाव

मराठ्यांना आरक्षण

नाकारण्यामागे षड‌्यंत्र

सग्यासोयऱ्यांच्या मुद्यावरून

मागे हटणार नाही

logo
marathi.freepressjournal.in