
धाराशिव : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या २९ ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. फडणवीस यांनी आंतरवाली सराटीची चूक पुन्हा करू नये. याप्रकरणी त्यांनी काही गडबड केल्यास त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधान मोदींना भोगावी लागेल. ही धमकी नव्हे तर मी तुम्हाला समजावून सांगत आहे, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईला धडक देणार आहेत. ते तिथे आझाद मैदानावर आंदोलन करतील. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी धाराशिव शहरात मराठा समाजाची एक बैठक झाली. या बैठकीत बोलताना जरांगे यांनी मराठा समुदायाला एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्वांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी व्हा. जो नेता या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला मराठा समाजाने आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत धूळ चारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
एकदा आमचे डोके फुटले. अजूनही आमच्या अंगातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. आंतरवालीतील माता-भगिनींना मोठे दुःख सहन करावे लागले. त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागले. त्यांच्या मांड्यांना टाके बसले. त्यामुळे फडणवीस साहेबांना पुन्हा सांगतो, तुम्ही पुन्हा ती चूक करू नका. त्या भानगडीत पडू नका, असा इशारा जरांगे यांनी फडणवीस यांना दिला.
मराठ्यांच्या नादी लागू नका. काय करायचे ते गोडी गुलाबीने करा. त्यावेळी जे घडले ते घडले. आता पुन्हा त्या भानगडीत पडू नका. ही धमकी नाही तर, मी तुम्हाला समजावून सांगत आहे. कारण तुम्हाला ती खोड आहे. आमच्या आई-बहीण, पोरांवर हात पडला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील. तुमच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या सरकारलाही हादरा बसेल. मराठे वेळोवेळी मार खायला मोकळे नाहीत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.