'ही शेवटची फाईट आहे. सरकारपुढे आता दोनच पर्याय आहेत. एकतर आरक्षणाचा विजय घेऊन वापस येणार, अन्यथा मला मेलेलेच वापस घेऊन यावे लागेल, त्याशिवाय आता माघार नाही. कारण मी माझ्या मराठा समाजासाठी माझं जीवन अर्पण केलंय', असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला दिला. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
मराठा आणि कुणबी एकच -
आरक्षण 20 तारखेच्या अगोदरच दिले जाईल असे राज्य सरकार आश्वस्त करत असतानाही तुम्ही मुंबईत येण्यावर ठाम का? असा प्रश्न जरांगे यांना विचारला असता, "सरकारला या अगोदर तीन महिन्यांचा वेळ दिला होता, नंतर 40 दिवसांचा आणि आता पुन्हा 24 डिसेंबरपर्यंत दोन महिन्यांचा वेळ दिला होता. पण सरकारनं त्याही वेळेत काही केलं नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. राज्यातला मराठा समाज ओबीसीत मोडतो. या मागणीसाठी 4 दिवसांचा वेळ दिला होता. परंतु कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे असे राज्य सरकारने सांगितले होते. मग आता 54 लाखांच्या नोदी सापडल्या आहेत. तर मग आता कायदा पारीत करून मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्यात अडचण काय ?" असा सवाल जरांगे यांनी विचारला. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.
"आम्ही आतापर्यंत त्यांच्यावर (मुख्यमंत्र्यांवर) विश्वास ठेवला. त्यांच्या शब्दाचा सन्मान ठेवला. त्यांच्या शब्दाचा सन्मान ठेवला. जे जे मंत्री आले त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांचा सन्मान केला. त्यांनी विश्वासाला पात्र व्हायला हवं होतं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन दिलं. पण, तसं केलं नाही. तिथे ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. अंतरवालीतील गुन्हे मागे घेऊ म्हटलं, तिथेही ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. उलट आमच्याच लोकांना अटक केली. आमच्याच लोकांना नोटीस देत आहेत", असं जरांगे म्हणाले.
सुट्टी काढून मुंबई या
मला माहीत आहे, माझा समाज घरी बसणार नाही. काम बुडालं तरी हरकत नाही. रजा टाकली तरी हरकत नाही. 10 ते 15 दिवसात कामं उरका, रजा टाका आणि मुंबईकडे वळा. तुमच्या साथीची गरज आहे. खांद्याला खांदा लावून उभं राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाला केले.
अंतरवालीच्या बाहेर पाऊल टाकेपर्यंत आरक्षण द्या-
20 जानेवारीला अंतरवालीच्या बाहेर पाऊल टाकेपर्यंत सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. आता चर्चाफिर्च्या नाही. फक्त आरक्षण द्या. आम्ही एक घंटाही वेळ देणार नाही. भारताने काय जगाने एवढी गर्दी पाहिली नसेल एवढा मराठा समाज बाहेर पडेल. मुंगीला पाय ठेवायला जागा राहणार नाही, असं जरांगेंनी सांगितलं.